त्या युवकावर कठोर कारवाई करण्याची व यामागील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या त्या युवकाचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर सदर युवकावर कठोर कारवाई करण्याची व यामागील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी विभागीय पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

शहरातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह संभाषण केल्याने सर्वच बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी मुस्लिम समाजाने रविवारी (दि.6 ऑगस्ट) या घटनेचा निषेध नोंदवून पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी अब्दुस सलाम खोकर, हाजी शौकत तांबोळी, हाजी मन्सूर शेख, नगरसेवक समद खान, मुजाहिद (भा) कुरेशी, साहेबान जहागीरदार, वहाब सय्यद, नवेद शेख, मुशाहिद शेख, आरिफ शेख, मुजाहिद सय्यद, खालिद शेख, आजीम राजे, अल्तमश जरीवाला, समी खान, जावेद शेख, ॲड. अशरफ शेख, फय्याज जहागीरदार, अजिम जहागीरदार, पप्पू जहागीरदार, शहेबाज शेख, अमीर सय्यद, शाकीर शेख, सलीमभाई रेडियमवाले, सादिक शेख, रबनवाज सुभेदार, मोसिन शेख, सलीम शेख, समीर बेग, अकदस शेख, तनवीर शेख आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असून, मुस्लिम समाजामध्ये त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या देखील भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वक्तव्याचा मुस्लिम समाज जाहीर निषेध करत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे षडयंत्र रचण्यात आले आहे.

मुस्लिम समाजाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काही घटनाक्रम प्रामुख्याने समोर येत आहे. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारकपणे करण्यात आलेल्या संभाषणाची सखोल चौकशी करून संभाषण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी व या षडयंत्रमागील मुख्य सूत्रसंचाराचा शोध घेण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.