मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे प्रारंभ
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात आरोग्याचे महायज्ञ सुरु आहे. धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन त्यांच्या जीवनातील वेदना दूर करुन त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात 10 ते 15 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ मंगेश चिवटे यांच्या हस्ते झाले. या शिबिराचे प्रारंभ वडगाव गुप्ता रोड नवनागापूर येथील श्री साई चैतन्य हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्रचिकित्सा, रक्तदाब व मधुमेह तपासणी, गरोदर माता समुपदेशन आणि आहार मार्गदर्शन शिबिराने झाले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे, उपजिल्हाप्रमुख काकासाहेब शेळके, डॉ.अमित महांडुळे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, आकाश कातोरे, धाडगे महाराज, मितेश शहा, उद्योजक महांडुळे, वैभव सांगळे, रवी राऊत, अमोल बागडे, सोनू ढोणे, राजू चव्हाण, राजेंद्र शेटे, पांडुरंग दळवी, संग्राम शेळके, केदार हजारे, अथर्व गंगावणे, अनिल मगर, शेखर ढुमणे, रवी बोडके, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

काकासाहेब शेळके म्हणाले की, खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना मिळण्यासाठी शहरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याची विकासात्मक दिशेने वाटचाल सुरू असताना, सर्वांचे निरोगी आरोग्य व व्याधीमुक्त जीवन करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कटिबध्द आहे. या उद्देशाने सर्वसामान्यांना तातडीने वैद्यकीय मदत देखील उपलब्ध करुन दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.अमित महांडुळे यांनी श्री साई चैतन्य हॉस्पिटलच्या माध्यमातून कामगार विमा योजनेचा लाभ दिला जात आहे. याचा लाभ देखील कामगार वर्गाने घेण्याचे सांगितले.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये रुग्णांची अस्थिरोग, नेत्रचिकित्सा, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच बालकांची देखील यावेळी तपासणी पार पडली. गरोदर मातांना आहार व व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
12 जून रोजी छत्रपती संभाजी नगर रोडच्या सुरभी हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान तपासणी, उपचार व मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. 14 जून रोजी नगर मनमाड रोड, सावेडी येथील गरुड कॅन्सर सेंटर येथे कॅन्सर तपासणी, मार्गदर्शन, शस्त्रक्रिया व केमोथेरपी केली जाणार आहे. या शिबिराचा समारोप 15 जून रोजी पाईपलाईन रोड, तुळजाभवानी मंदिर समोरील साई माऊली हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराने होणार असल्याची माहिती अनिकेत कराळे यानी दिली.