दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळावे -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

दिवाळी सण सर्वांना उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळावे. मागील अनेक वर्षापासून शिक्षक, शिक्षकेतरांना दिवाळीसाठी मिळणारे सानुग्रह अनुदान बंद करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य कर्मचार्यांचे दिवाळी सणासाठीचे सानुग्रह अनुदान पुन्हा सुरू करावे, सर्व कर्मचार्यांना दिवाळी अगोदर 21 आक्टोबर पूर्वी वेतन द्यावे, केंद्र सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वाढ झालेला महागाई भत्ता लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, बाबा कदम, आनंद पवार आदी उपस्थित होते.
सदर प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असून, संबंधित विभागाशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले असल्याचे शिवनाथ दराडे यांना सांगितले. तसेच यावेळी मनपा प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग व प्राथमिक शाळा अनुदानचे निवेदन देखील देण्यात आले आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असल्याचे बोडखे यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.
