इतर विभागाचे माजी आमदार उपोषणात होणार सहभागी; शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन
अनुदान मिळवून देखील शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक लाभापासून वंचित असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे पगार वेळेत व राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे, शालार्थ आयडी प्रकरण निकाली काढण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, 17 ऑगस्ट पासून शिक्षण आयुक्त (पुणे) यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या उपोषणात कोकण विभागाचे माजी आमदार, पुणे विभागाचे माजी आमदार व अमरावती विभागाचे माजी आमदार सहभागी होणार आहेत.
शिक्षकांच्या प्रामुख्याने असलेल्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्व स्तरावरील शालार्थ आयडी प्रकरण निकाली काढावी, वाढीव पदांची माहिती कनिष्ठ महाविद्यालय शासनाला तात्काळ पाठवणे, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करण्यात यावे, शासन स्तरावर तसे आदेश निर्गमित करण्यात यावे, मुख्याध्यापकांना व शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळण्यात यावे, जिल्हास्तरावर प्रलंबीत असणाऱ्या संच मान्यता मिळाव्या आणि 20, 40, 60 टक्के अनुदानित शिक्षकांचे पगार वेळेत करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनास शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दराडे व सर्व विभागाच्या माजी आमदारांनी केले आहे. यापूर्वीही सर्व शिक्षक आमदारांनी पुणे ते मुंबई पायी दिंडी काढून अंशतः अनुदानित शाळांसाठी 1160 कोटी रुपयाचे अनुदान मिळवले होते. पण शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षकांचे शालार्थ आयडी मिळत नसल्यामुळे व आर्थिक मागणी होत असल्यामुळे आलेले अनुदान शालार्थ आयडी प्रकरणांमुळे शिक्षकांना मिळालेले नाहीत. त्यासाठी हे आंदोलन होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सदर मागणीचे निवेदन दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पाठविले आहे.