• Fri. Mar 14th, 2025

शहरात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाला प्रारंभ

ByMirror

Mar 7, 2023

नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरला शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

समाजात तेढ निर्माण करण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहे -दिलीप सातपुते

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शहरात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगर येथे करण्यात आले. शहरात शिवसेना व युवा सेनेच्या शंभर शाखा सुरु करण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते व संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, नगरसेवक लालबोंद्रे, सचिन राऊत, युवा सेनाप्रमुख महेश लोंढे, उपशहर प्रमुख आनंद वाळके, युवा सेना जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे, आकाश कातोरे, शाखा प्रमुख योगेश चौधरी, उपशाखा प्रमुख बबलू परदेशी, मोहन ठाणेकर, ओंकार सातपुते, राम पाटील, अशोक लेंडकर, बाळासाहेब नाईक आदींसह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या शाखेला मंदिराचे स्थान आहे. या ठिकाणी गोरगरिबांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी प्रत्येक शाखा पदाधिकारीची आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून गेल्यास नागरिक देखील पक्षाला जोडले जाणार आहे. शहराच्या डीपी रस्त्यांसाठी मुख्यमंत्री यांनी 20 कोटीचा निधी दिला आहे, आणखी पंधरा 15 कोटी शहर हद्दवाढीसाठी मिळणार आहे. मात्र काही राजकारणी स्वत: निधी आणल्याची बतावणी करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.


संपर्क प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, शाखा म्हणजे सर्वसामान्यांची अडचणी सोडविण्याचे ठिकाण आहे. शहरात शिवसेनेचा भगवा झंझावात सुरू झाला आहे. शहरात अनेक प्रश्‍न प्रलंबीत असून, ते शिवसेनेच्या माध्यमातून सुटणार आहे. सरकार आपले असल्याचे प्राधान्याने प्रश्‍न सोडविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, अनेक महिन्यांपासून न्यायालयीन व निवडणूक आयोग प्रक्रियेत पक्ष गुंतलेला असताना, आखेर सकारात्मक निकाल लागला आहे. शहरात शाखा उद्घाटनाची सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला गेला आहे. अनेक घोटाळे उघडकीस येत असून, स्मशानभूमीसाठी 32 कोटी रुपये खर्च करुन सर्वसामान्यांच्या पैश्यावर डल्ला मारला जात आहे. शहरातील वातावरण दूषित करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहे. भ्रष्टाचार मुक्त मनपा व दहशतमुक्त शहर करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. या शाखा उद्घाटनाप्रसंगी भाऊसाहेब भातणकर, रावळे सर, टिनू थॉमस, जेम्स थॉमस, ऋषीकेश सैंदर, अशोक काकळीज, ऋषीकेश गायकवाड, ओंकार लेंडकर, इमरान शेख, राजू सय्यद, निलेश हजारे, किशोर विधाते, राजू बुगे, सुरज बुगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *