विविध आसनाच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण
क्रीडा व युवक सेवा संचनालय, अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय व श्री मार्कंडेय विद्यालयाचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य, सदृढ शरीर व प्रसन्न मनासाठी विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने शहरात जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी योगातील सुर्यनमस्कार, वीरभद्रासन, उत्कटासन, उत्तरासन, सेतुबंधासन, नटराजासन, त्रिकोनासन आदी विविध आसनाचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्र्ट राज्य व अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने या जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी मैदान येथे रंगलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे,संस्थेचे विश्वस्त राजूशेठ म्याना, माजी मुख्याध्यापक दिपक रामदिन, प्रभारी मुख्याध्यापक संदिप छिंदम, योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव उमेश झोटींग आदी उपस्थित होते.

बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीत योग आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. प्राचीन भारतीय योग चिकित्सेला संपूर्ण जगाने स्विकारले आहे. कोरोना काळात अनेक रुग्णांनी योग-प्राणायामचा अवलंब केल्याने त्यांच्यात लवकर सुधारणा होऊन ते बरे झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. उत्तम आरोग्यासाठी योग-प्राणायाम दररोज करण्याचे त्यांनी सांगितले. दिपाली बोडखे यांनी योग, व्यायामासाठी युवतींनी देखील पुढे येण्याची गरज आहे. जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी योगाचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्तविकात संदिप छिंदम यांनी स्पर्धेची माहिती देऊन योगाचे महत्त्व विशद केले. तर शाळेत विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची व व्यायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने घेण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. उमेश झोटींग म्हणाले की, स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. यासाठी योगा, प्राणायाम हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजूशेठ म्याना यांनी विद्यार्थ्यांना प्रगती साध्यण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे आवश्यक आहे. योगा, प्राणायाम शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी परिणामकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
योगासन स्पर्धेचे काम स्पोर्ट्स असोसिएशनचे सहसचिव दिलीप झोयेकर, प्रणिता तरोटे, पंच रूतूजा वाल्हेकर, अक्षता गुंड-पाटील, आप्पा लढाणे, प्रविण पाटील, सुरेखा भंवर, काजल ताजणे यांनी पाहिले. यावेळी प्रा. बत्तिन पोट्यन्ना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, ग्रंथपाल विष्णू रंगा आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश आनंदास, सुहास बोडखे यांनी परिश्रम घेतले.

