• Fri. Mar 14th, 2025

शहरात बसपाची समीक्षा बैठक

ByMirror

Jun 28, 2023

राज्य पदाधिकार्‍यांनी घेतला जिल्ह्यातील कार्याचा आढावा

शहराध्यक्षपदी फिरोज शेख यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांची समीक्षा बैठक शहरात पार पडली. यावेळी बसपाचे प्रदेश प्रभारी मनीष आनंद, प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश प्रभारी हुलगेश चालवादी, महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव काळूराम चौधरी, प्रदेश सचिव शीतलताई गायकवाड, बाळासाहेब आवारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


बसपाची जुनी कार्यकारणी बरखास्त करुन नुकतीच जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिल्पा गार्डन येथे बैठक घेण्यात आली. प्रदेश प्रभारी मनीष आनंद यांनी पदाधिकार्‍यांपुढे पक्षाची ध्येय धोरण स्पष्ट केले.


प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने म्हणाले की, सत्ताधार्‍यांची जातीयवादी प्रवृत्ती, हुकुमशाहीने सर्वसामान्य जनता व युवक वर्ग वैतागला आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पिछेहाट व्हावे लागले. लोकशाही विचाराने समाज जोडून विकास हा बहुजन समाज पार्टीचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रदेशच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी राहत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोठे संघटन केले जात असताना जिल्हाभर बसपाचे बुथ सेक्टर अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या बैठकीत फिरोज इम्रान शेख यांची बसपाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शेख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीसाठी प्रदेश कार्यालयीन सचिव डॉ. अभिजित मनवर, जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, राजू खरात, शंकर भैलुमे,संतोष जाधव, सुनील मगर, दता सोनवणे, माधव त्रिभुवन, प्रकाश अहिरे, राहुल छातीसे, शशिकांत वालेकर, रामचंद्र पवार, रवींद्र चौधरी, गणेश भुसारी, संजय संसारे, शम्मा पठाण, समिना सय्यद, आरिफा पटेल, शबाना पठाण, रुकसार पठाण आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, विधानसभा, शहर पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *