माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर करणार मार्गदर्शन
फुटबॉल खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीने एटी फाऊंडेशनच्या सहकार्याने 1 ते 5 एप्रिल दरम्यान हे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असून, या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन फुटबॉल खेळाडूंना करण्यात आले आहे.

कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू असलेली तुरंबेकर आशिया खंडातील सर्वात जुन्या डेम्पो स्पोर्टस क्लबमध्ये प्रशिक्षण देणारी एकमेव महिला खेळाडू आहे. मागील 15 वर्षाहून अधिक काळ फुटबॉल क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू घडले आहेत. महिलांनाच नाहीतर युवकांना देखील ती प्रशिक्षण देते.
या प्रशिक्षण वर्गात 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत दोन सत्रामध्ये प्रशिक्षण वर्ग अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. सकाळच्या सत्रात खेळाडूंना विविध अॅक्टिव्हिटीद्वारे नेतृत्व व खेळाचे कौशल्ये कसे विकसित करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
दुपारच्या सत्रात फुटबॉल स्पर्धा व जगलिंग स्पर्धा होणार आहेत. तसेच फुटबॉल खेळातील उपलब्ध असणार्या संधींबद्दल मार्गदर्शन करुन फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाणार आहे. फुटबॉल या खेळाचे आधुनिक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे आणि जीवन कौशल्ये, मुलभूत कौशल्ये आणि सांघिक कार्याचे महत्त्व खेळाडूंना शिकवण्यासाठी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी प्रयत्नशील असल्याचे म्हंटले आहे. या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी पल्लवी सैंदाणे 8208771795 व 8796858947 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.