विजयी वाटचालीचा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
तर निवडून आल्याचे रात्रीतून झळकले फ्लेक्स
अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत तिसरी फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मताधिक्याची आघाडी घेतली. ही बातमी मिळताच शहरातील लालटाकी सिध्दार्थनगर येथील काँग्रेसच्या शहर पक्ष कार्यालया बाहेर तांबे समर्थकांनी निवडून येण्यापूर्वीच गुरुवारी (दि.2 फेब्रुवारी) रात्री विजयी जल्लोष साजरा केला.

फटाक्यांच्या आतषबाजीत बाजीत पेढे वाटून विजयी वाटचालीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सत्यजीत तांबे यांचा विजय असो, च्या घोषणा देत मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते. तर चौकात पदवीधर आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सत्यजीत तांबे यांच्या अभिनंदनाचे फलक देखील झळकविण्यात आले. ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जल्लोष कार्यक्रमाप्रसंगी अॅड. अनिल धाडगे, अॅड. अजिंक्य काळे, अॅड. ज्ञानेश्वर फटांगरे, अॅड. नितीन खैरे, तुषार धाडगे, दिपक धाडगे, मंगेश तळवळे, अमित चव्हाण, निलेश गायकवाड, अविनाश सारसर, विकी चव्हाण, सागर कदम, करण चव्हाण अदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिकमधून मतमोजणीच्या निकालाची अपडेट पुढे येत होती, तसे कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते. तीसर्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आघाडीवर होते. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगा पाटील पीछाडीवर आहेत. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात पहिल्या फेरीच्या सुरुवातील अटीतटीची लढत दिसत होती. दोघांच्याही नावासमोर मतपत्रिकांचा जवळपास सम-समान गठ्ठे होते. मात्र, त्यानंतर तांबे यांनी दुसर्या फेरीनंतर आघाडी घेण्यास सुरुवात केली. तिसर्या फेरीत मताधिक्याचा मोठा फरक दिसल्याने कार्यकर्त्यांनी तांबे यांचा विजय निश्चित समजून जल्लोषाला सुरुवात केली.
सत्यजीत तांबे यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 2023 मध्ये आमदार होण्याची स्वप्नपुर्ती झाली आहे. ते आमदार व्हावे अनेक सुशिक्षित लोकांचे स्वप्न होते. शहरात पहिल्यांदाच निवडणुकीत उभे राहिल्यनंतर जनतेने देखील चांगल्या प्रकारे त्यांच्याबाजूने कौल दिला होता. मात्र तो पराभव आज भरुन निघला आहे. व्हिजन व अभ्यासू युवा नेतृत्व निवडून आल्याचा सर्वांना आनंद आहे. दोन-तीन पक्ष फिरुन आलेल्यांनी पक्ष निष्ठा राखलेल्यांना गद्दारीची उपमा देणे चुकीचे आहे. मतदारांनी आपल्या मतांच्या कौलाने गद्दार म्हणणार्यांना उत्तर दिले आहे. -दीप चव्हाण (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते)