• Thu. Oct 16th, 2025

शहरातील युवा विधीज्ञांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ByMirror

Aug 11, 2023

राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्षाच्या सदस्यपदी वकीलांची नियुक्ती

दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची जबादारी राष्ट्रवादी विधी कक्ष उचलणार -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हा वर्ग करत असतो. जिल्हा न्यायालयात कार्यरत युवा विधीज्ञ राष्ट्रवादी पक्षाच्या विधी कक्षाला जोडले गेले असून, समाजातील दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची जबादारी हा विभाग उचलणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


आमदार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्ष प्रमुख ॲड. अंजली आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या विधीज्ञ युवक-युवतींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांची विधी विभागाच्या सदस्यपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी ॲड. आव्हाड, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, समाजातील सर्वच घटक वकील वर्गाशी जोडलेला आहे. पूर्वीपासूनच प्रत्येक कुटुंबाचे डॉक्टर व वकिलांशी घरगुती ऋणानुबंध असून, विविध निर्णयात त्यांचा सल्ला घेतला जातो. राष्ट्रवादीच्या विधी कक्षाच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती नसलेल्या नागरिकांना हा विभाग न्याय मिळवून देण्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. ही निवड जिल्ह्यापुरती न राहता याचा उपयोग राज्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रदेश विधी कक्ष प्रमुख ॲड. अंजली आव्हाड म्हणाल्या की, जिल्हा न्यायालयात काम करणारे विधीज्ञ सामाजिक जीवनात कार्य करताना राष्ट्रवादीच्या माध्यमातून सेवा देण्याचे कार्य करणार आहे. पक्षाची ताकत वाढवून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले जाणार आहे. विधी विभागाच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती नसलेल्या व न्यायालयात त्यांची बाजू मांडण्याचे काम या विभागाच्या वतीने निशुल्क केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाजातील सर्व वर्ग राष्ट्रवादीला जोडला गेलेला आहे. शहराच्या विकासात्मक वाटचालीत प्रत्येक वर्ग आपले योगदान देत आहे. युवा विधीज्ञ यांना एकत्र करुन अंजली आव्हाड यांनी उभे केलेले संघटन कौतुकास्पद आहे. विधी कक्षाच्या माध्यमातून युवकांना काम करण्याची मोठी संधी मिळाली असून, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून युवकांनी गरजूंची सेवा घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.


राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्षाच्या सदस्यपदी ॲड. प्रणाली चव्हाण, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. रुपाली भोसले, ॲड. विरेंद्र शिंदे, ॲड. प्रदीप भोसले, ॲड. आसिफ शेख, ॲड. वरद शिंदे, ॲड. अमोल गरड, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. ज्ञानेश्‍वर करांडे, ॲड. योगेश धनवडे, ॲड. अक्षय काळे, ॲड. अतुल बरफे, ॲड. राहुल हिरनवाले, ॲड. अक्षय शिंदे, ॲड. दर्शन भिंगारदिवे, ॲड. अमोल अकोलकर, ॲड. विशाल पांडुळे, ॲड. संतोष तुपे, ॲड. राजेंद्र कानडे या वकीलांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *