भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी केली पहाणी
नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून अमरधामला अस्थी कलश कुंड देऊन देखील अस्थी रक्षाची विटंबना -अंतोन गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील अमरधाममध्ये अस्थी टाकण्यासाठी अस्थी कलश कुंडाची व्यवस्था करुन देखील, अस्थी रक्षा अस्थाव्यस्थ टाकून होत असलेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी रविवारी (दि.18 सप्टेंबर) पहाणी केली. यावेळी अंतोन गायकवाड, भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा गायकवाड आदी उपस्थित होते.

नालेगाव येथील अमरधाममध्ये नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून शारदा अंतोन गायकवाड यांनी अमरधाममध्ये अस्थी कलश कुंड भेट दिले होते. मात्र कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे त्या कुंडात चक्क कचरा, तर अमरधाम येथे अंत्यविधी झालेल्यांच्या अस्थी रक्षा इतरत्र अस्थाव्यस्थ टाकून विटंबना केली जात असल्याचा आरोप अंतोन गायकवाड यांनी केला आहे.

तसेच नालेगाव अमरधाम मधील प्रश्न स्वखर्चाने सोडविण्यासाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन तयार असून, या कामासाठी अधिकृत परवानगी मिळण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने महापालिकेकडे यापूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याला महापालिका प्रशासनाने प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तर अंत्यविधी झाल्यानंतर अस्थी रक्षा इतरत्र फेकून न देता, अस्थी कलश कुंडात साचविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
