पुरस्कारार्थींमध्ये काझी महाराष्ट्रातील एकमेव महिला शिक्षिका
मूळ नगरच्या असलेल्या काझी या शिक्षिकेचा सर्व नगरकरांना अभिमान -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या कन्येने शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवून शहराचे नांव उंचावले. लग्नानंतर महिलांना शिक्षणासाठी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. मात्र शगुफ्ता काझी यांनी अडचणीवर मात करुन राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. ज्ञान दान हे असे, पवित्र कार्य आहे जे दिल्याने वाढते. मूळ नगरच्या असलेल्या या शिक्षिकेचा सर्व नगरकरांना अभिमान असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
नगरच्या असलेल्या व लग्न होऊन औरंगाबादला गेलेल्या शगुफ्ता शेख-काझी यांना सेंटर फॉर एज्युकेशन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फालके, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, कासम शेख, इरफान कासम, फरमान कासम, एहेसान कासम, बाबा जहागीरदार, सलमान काझी, फैजान इरफान, सुलतान शेख, अली शेख, प्रशांत वाघ, शहानवाझ शेख, बंटी तिजोरे आदी उपस्थित होते.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/09/MIR_4932.jpg)
प्रास्ताविकात रफिक मुन्शी म्हणाले की, राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणार्या नगरच्या कन्येचे सर्वांना अभिमान आहे. नगरच्या शैक्षणिक संस्थांनी तिची पायाभरणी केली असल्याचे स्पष्ट करुन, मुलींना आपल्यातील क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध करावे व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. साहेबान जहागीरदार यांनी अल्पसंख्यांक समाजातील मुलीने घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. त्याच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र फाळके म्हणाले की, मुस्लिम समाजात मुली उच्चशिक्षित होत असून, मुले मात्र मागे पडत आहे. मुलांनी देखील शिक्षणाकडे वळण्याची गरज आहे. मुलगी स्वकर्तृत्वावर पायावर उभी राहिल्यास तिला समाजात व कुटुंबात मानाचे स्थान मिळते. नगरचे संस्कार व शिक्षणाच्या पायाभरणीने काझी हिने यश गाठले आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य पुढे सुरु ठेवण्याचे त्यांनी सांगितले.
शगुफ्ता शेख-काझी या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कासम शेख यांची मुलगी असून, सध्या ती लग्नानंतर औरंगाबाद येथे एका खासगी शाळेत कार्यरत आहे. देशभरातून प्राप्त झालेले निवडक शिक्षकांच्या यशोगाथांची शिक्षण तज्ञांनी पहाणी करुन, या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची नियुक्ती केली होती. यावर्षी महाराष्ट्रातून त्यांनी एकमेव महिला शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त केला आहे.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/08/Stella-1-August-2.jpeg)