जमीन बळकाविण्यासाठी शेतकर्यांवर दहशत निर्माण करत असल्याचा आरोप
शेतकर्यांना त्यांच्याच शेतात जाण्यास अडकाठी
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील व्ही.आर.डी.ई. मधील त्या अधिकारीच्या दहशतीमुळे वैतागलेल्या बाबुर्डी (ता. नगर) येथील शेतकर्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. तर शेत जमीन बळकाविण्याच्या तयारीत असलेल्या तो अधिकारी शेतकरीला वर्गा शेतात जाण्यापासून रोखत असल्याचा व बंदुक दाखवून धमकावित असल्याचा आरोप करुन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी तक्रारदार शेतकरी पोपट परभणे, रामदास लांडगे, भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब परभणे, पवन लांडगे, महादेव गवळी, दत्तू लांडगे, दत्तू विठेकर, विश्वनाथ पंचमुख आदी उपस्थित होते.
व्ही.आर.डी.ई. येथील त्या अधिकारीने चार ते पाच वर्षापूर्वी अरणगाव व बाबुर्डीची शेवटची हद्द असलेल्या 123/2 गटात शिवालगत शेत जमीन घेतली आहे. तर त्याला लागून असलेल्या बाबुर्डी हद्दीत पोपट परभणे यांची शेत जमीन आहे. सदर व्यक्ती व परभणे यांच्या जागेच्या मधून अठरा फुटाचा शिवरस्ता आहे. मात्र त्या व्ही.आर.डी.ई.च्या अधिकार्याने बाबुर्डी हद्दीतील इतर शेतकर्यांच्या शेत जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला आहे. शेतकर्यांना त्यांच्याच शेतात जाण्यापासून सदर व्यक्ती रोखत आहे. शेतजमीन बळकाविण्यासाठी त्याने शेतकर्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सदर अधिकार्याने गावकर्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले असून, इतर प्रतिष्ठित व्यक्तींना खोटे गुन्ह्यात अडकविण्याचा त्याची तयारी असल्याचे तक्रारदार शेतकर्यांनी म्हंटले आहे.
सदर जागेची मोजणी करण्यात आली होती. मात्र त्या अधिकार्याने मोजणी कार्यालयातून प्रकरण चोरी केले. शेतातील बांध मोडणे, वृक्ष तोडणे व महिलेला पुढे करून दादागिरी करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या तो अधिकारी देत आहे. प्रत्येक कार्यालयात जावून खोटी माहिती देऊन अधिकारी व शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. या जागेची शासकीय मोजणी करण्यात आली, मात्र त्याला ती मोजणी देखील मान्य नाही व स्वतःच्या जमिनीची मोजणी देखील तो करु देत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
व्ही.आर.डी.ई.च्या त्या अधिकार्याने शेत जमीनीवर बेकायदेशीर ताबा घेऊन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न थांबवावा, शेतकर्यांवर दहशत निर्माण करणार्या संबंधित अधिकारीवर कारवाई करावी, न्यायालय मार्फत मोजणी होत नाहीत तोपर्यंत शेतकरी वर्गाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी बाबुर्डी येथील शेतकर्यांनी केली आहे.