विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व अधिकारी वर्ग सहभागी
योग भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य ठेवा -सम्राट कोहली
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव रोड, व्ही.आर.डी.ई. केंद्रीय विद्यालय क्रमांक तीन येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या योग कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होऊन योग व प्राणायामाचे धडे गिरवले.
योग प्रशिक्षिका कुमारी माळवदकर यांनी योग, ध्यान व प्राणायामाचे महत्त्व सांगून उपस्थितांनी योगासने प्रात्यक्षिकासह करुन घेतली. तर विविध आसनांची माहिती देऊन त्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे विशद केले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर योगमय बनले होते.

प्राचार्य सम्राट कोहली म्हणाले की, योग भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. निरोगी जीवनासाठी योगाचा संपूर्ण जग स्विकारत असताना त्यांचे महत्त्व जाणून घेण्याची गरज आहे. योगाने मन प्रसन्न व एकाग्र राहते तर जीवन निरोगी राहते. लहान वयातच मुलांना योग, ध्यानची सवय लागल्यास निरोगी व सक्षम पिढी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.