भरती प्रक्रिया त्वरीत थांबविण्याची भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशची मागणी
संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर करा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून पैसे घेऊन केलेली भरती, मयत कर्मचारीच्या नावाने घेतलेले वेतन आदींसह इतर प्रकरणात 22 ते 23 गुन्हे दाखल असलेल्या सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्था चालक पुन्हा जाहिरात देऊन राबवित असलेली भरती प्रक्रिया त्वरीत थांबवावी व संस्थेने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर करुन शाळेची मान्यता रद्द करावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांची भेट घेऊन निवेदन दिले. संस्था चालकांवर असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट असताना देखील बेकायदेशीरपणे भरती प्रक्रिया राबवित असल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी कारवाई न झाल्यास 3 जुलै रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालया समोर हलगीनाद व बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कुलथे, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटोळे आदींसह फसवणूक झालेले शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेने केलेल्या कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार प्रकरणी संस्थेच्या बँक खात्यातून सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय (नवी दिल्ली) येथील अधिकारींच्या खात्यावर वर्ग केलेल्या लाखो रुपयांची व संस्थेच्या सर्व गोलमाल कारभाराची 18 एप्रिल रोजी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने चौकशी केली असून, त्याचा अहवाल अद्यापि शासनाला दिलेला नाही. या चौकशी अहवालावर तात्काळ निर्णय घेऊन संस्थाचालकांवर अपहाराचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशी ग्रामीण विकास प्रतिष्ठान अहमदनगर संचलित अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा व वसतिगृहाची (खांडगाव ता. पाथर्डी) मान्यता रद्द करून संस्थेचे बँक खाते बंद करावे.
या संस्थेत शिक्षक भरतीसाठी 22 उमेदवारांकडून पैसे घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल असताना पुन्हा 18 जून रोजी काही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून सुशिक्षित तरुणांना फसविण्यासाठी पुन्हा शिक्षक भरतीचा घाट घातला जात आहे. संस्थेला नोटीस देऊन भरती प्रक्रिया थांबवावी, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आठ दिवसात शासनाला सादर करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
संस्थाचालकांवर अपहार प्रकरणी विविध गुन्हे दाखल होऊन ते न्यायप्रविष्ट असताना पुन्हा शिक्षक उमेदवारांना फसवणुकीचा प्रकार जाहिरात देऊन सुरु करण्यात आला आहे. संस्थेच्या खांडगाव (ता. पाथर्डी) येथील अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा व वसतिगृहात विद्यार्थी नसताना फक्त पैसे उकळण्यासाठी शिक्षक भरतीचा फार्स ठरणार असल्याचे रघुनाथ आंबेडकर यांनी म्हंटले आहे.