विविध मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी दाखवली कौशल्याची चुणूक
मैदानी खेळाने विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास -दत्ता गाडळकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विविध मैदानी क्रीडा स्पर्धा रंगल्या होत्या. मैदानी खेळात सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानदेव पांडुळे, बाळासाहेब विधाते, रामदास कानडे, सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात अमोल मेहेत्रे यांनी खेळाचे महत्त्व विशद केले. पाहुण्यांचे स्वागत शिवाजी विधाते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भाऊसाहेब पुंड यांनी करुन दिला.
दत्ता गाडळकर म्हणाले की, मैदानी खेळाने विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो. अभ्यासाप्रमाणे खेळाला देखील महत्त्व देणे आवश्यक आहे. खेळाने जीवनात शिस्त निर्माण होऊन जीवनात संघर्ष करण्याची ऊर्जा मिळते. खेळाडू हा जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव पांडुळे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये न अडकता मैदानी खेळाकडे वळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश दरवडे यांनी केले. आभार लता म्हस्के यांनी मानले.

