लंडन किड्स प्री स्कूलच्या बाल वारकर्यांची पायी दिंडी सोहळा उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित केडगाव, शाहूनगर येथील लंडन किड्स प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची पायी दिंडी काढण्यात आली. वारकर्यांच्या वेशभूषेत चिमुकले मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
दिंडीत सहभागी झालेल्या विठ्ठल-रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, मीराबाई आदी संत महात्म्यांचे वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शाळेपासून शाहूनगर बस स्थानक मार्गे माधवनगर मधील विठ्ठल मंदिरात पायी दिंडीचा समारोप झाला. बाल वारकर्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा आदी विविध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन यामध्ये सहभागी झाले होते.
दिंडीची सुरुवात विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तिचे पूजन करून करण्यात आली. विविध ठिकाणाहून मार्गक्रमण झालेल्या या दिंडीचे पालक वर्गाने देखील मोठ्या उत्साहात स्वागत केले. दिंडीतील पालखी अग्रभागी ठेऊन हातात भगव्या पताका व टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला.
मुख्याध्यापिका रुचिता जमदाडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती दिली. यावेळी संस्थचे सचिव संदीप भोर, खजिनदार प्रसाद जमदाडे, शिक्षिका निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, पूजा जाधव, रुक्मिणी साबळे, मिना गायकवाड आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडीतील मुलांसाठी भोर व खोबरे परिवाराच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.