शनिवार पासून ईव्हीएम विरोधात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण
सर्व निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने भारतीय राज्यघटनेसह लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी जयंती निमित्त शनिवार व रविवारी (1 व 2 ऑक्टोबर) लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. शहरातील वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करुन देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलट पेपरवर घेण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आंदोलनाचे जालिंदर चोभे मास्तर यांनी दिली. तर लोकशाहीला गिळंकृत करणार्या ईव्हीएम मशीनच्या राक्षसाचे प्रतिकात्मक दहन विजया दशमीला केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
या उपोषणा दरम्यान भारतीय राज्यघटनेसह लोकशाही वाचवण्यासाठी जनजागृती पत्रकाचे वितरण केले जाणार आहे. ईव्हीएम बाबत अनेक संभ्रमावस्था आहे. जनतेच्या मनात अनेक प्रश्न असून, ईव्हीएम मशीन मध्ये अनेकवेळा हेराफेरी झाली असल्याचे उदाहरणे आहेत. 2019 च्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन घोटाळ्याचे अनेक गैरप्रकार समोर आले होते. ईव्हीएम मशीन हा लोकशाहीला गिळंकृत करणारा राक्षस ठरत आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम राक्षस मते कमी-जास्त करणार. यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे आवश्यक असल्याचे जालिंदर चोभे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
काल्पनिक रावण ऐवजी लोकशाहीत रावण ठरू पाहणार्या ईव्हीएम मशीन या राक्षसाचे दहन करणे काळाची गरज बनली आहे. बॅलेट पेपरवर सर्व निवडणुका होण्यासाठी नागरिकांना या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन चोभे मास्तर यांनी केले आहे. 2019 पासून हा लढा सुरू आहे. ईव्हीएम मशीनची प्रेत यात्रा काढून त्याचे दहन करण्यात आले होते. तसेच 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत बाबुर्डी बेंद (ता. नगर) येथे मतदान केंद्रावर ईव्हीएम फोडून निषेध नोंदविला होता. ईव्हीएम विरोधी चळवळ राबवून भारतीय राज्यघटनेसह लोकशाही वाचवण्याचा लढा सुरू असल्याचे चोभे यांनी म्हंटले आहे.
