दिल्लीगेट वेस समोर गो तमसपाल गो…, जय शिवाजी, जय डिच्चूकावाच्या जोरदार घोषणा
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील तमसबाणी संपविण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने शहरातील ऐतिहासिक दिल्लीगेट वेस समोर लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते व सत्तापेंढारीविरुध्द डिच्चूफत्ते मोहिमेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गो तमसपाल गो…, जय शिवाजी, जय डिच्चूकावाच्या जोरदार घोषणा दिल्या.
या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, वीरबहादूर प्रजापती, सखाराम सरक, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम, तुकाराम बोरगे, अशोक भोसले, पोपट भोसले, संतोष जाधव आदी सहभागी झाले होते.
2013 च्या दिल्ली येथील लोकपाल आंदोलनामुळे देशात भ्रष्टाचारविरोधी सुनामी निर्माण झाली आणि त्यातून 2014 साली लोकपाल देशात निर्माण झाला. पुढे जाऊन लोकपालाचा वृद्धाश्रम झाला आणि फक्त लोकपालची शेपटी शिल्लक राहिली. परंतु देशात तमसपालाने विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून जेरीस आणले. देशातील धर्मनिरपेक्षता संपूर्ण नष्ट केली आणि पुढे जाऊन देशात तमसबाणी लादण्यात आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने नागरिकांकडे लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते व सत्तापेंढारीविरुध्द डिच्चूफत्ते मोहिम राबविण्याचा आग्रह धरण्यात आला.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, लोकपाल आंदोलनातून भावनाविवश झालेल्या मतदारांनी भाजपला मतदान केले. परंतु त्यातून देशाचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतसत्ताक आत्मन्यायालयाचा वापर केला पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात देशातील गुट्टलबाज सत्तापेंढारी यांनी मतदारांना पैसे देऊन, जाती धर्माचा प्रभाव पाडून मागच्या दाराने सत्ता काबीज केली. पुढे जावून जनतेची सरकारी तिजोरी घरी वाहून नेली. त्यामुळे या देशात स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसाला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
वीरबहादूर प्रजापती म्हणाले की, सर्वसामान्यांमध्ये चांगल्या उमेदवारांना निवडून देण्याची व समाजविघातकांना सत्तेतून पायउतार करण्याची जागरुकता निर्माण होत नाही, तो पर्यंत बदल घडणार नाही. सत्तापेंढारींंमुळे लोकशाही धोक्यात आली असून, ही तमसप्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी संघटनेच्या वतीने नागरिकांमध्ये जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.