• Thu. Oct 16th, 2025

लायन्स व लिओ क्लबने स्नेहालयात साजरी केली वंचित मुलांसह दिवाळी

ByMirror

Oct 30, 2022

विविध खेळ व नृत्याद्वारे वंचितांची धमाल

पणत्यांच्या झगमगाटात आतषबाजीने उजळले आसमंत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने सलग सोळाव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील मुलांसह दिवाळी साजरी करण्यात आली. रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेले आसमंत तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. कोरोनानंतर यावर्षीचा निर्बंधमुक्त दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये स्नेहालयासह बालभवन व विविध संस्थेतील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.


दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्सचे प्रांतपाल राजेश कोठवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते श्रीकांत यादव, मंगेश सप्तर्षी, डॉ. एस. एस. दीपक, उद्योजक शरद मुनोत, मोहनलाल मानधना, राजेश पगारे, महिला बाल कल्याणचे बी. बी. वरुडकर, श्री देशमाने, रिजन चेअरमन सुनील साठे, झोन चेअरमन आनंद बोरा, अरविंद पारगावकर, नितीन मुनोत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लायन्सच्या अध्यक्षा डॉ.सिमरनकौर वधवा यांनी वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाचे सोळावे वर्ष असून, लायन्स क्लब मधील प्रत्येक सदस्य सेवाभावाने स्वतःला झोकून समाज घडविण्याचे कार्य करत आहे. या सेवा कार्यात लिओच्या युवक-युवतींनी देखील सामाजिक भावनेने योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत लिओच्या अध्यक्षा हरमनकौर वधवा, सचिव प्रणिता भंडारी यांनी केले.


वंचितांचे आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा सोहळा सलग सोळा वर्ष अविरतपणे घेतल्याबद्दल स्नेहालयाच्या वतीने लायन्स क्लब आणि लिओ क्लबच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.


वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी लायन्सचे प्रांतपाल राजेश कोठवडे म्हणाले की, आपल्या संपन्नतेने इतरांचे दुःख कमी करण्यासाठी लायन्सचे प्रत्येक सदस्य योगदान देत आहे. अवतीभोवती कुणी दुखी असू नये, हा संस्कार भावी पिढीत रुजविण्याचे कार्य लायन्स क्लब करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर घर घर लंगर सेवेत लायन्सने विशेष योगदान देऊन कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. सिने अभिनेते श्रीकांत यादव यांनी एक संघपणे समाजाचा विकास होण्यासाठी योगदान गरजेचे असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ला ओळखून आपल्यातील पाच इंद्रियांचे व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने वापर करून, गुणकौशल्य सिध्द करण्याचे गोष्टीतून संदेश दिला.


प्रारंभी स्नेहालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. दुपारच्या सत्रात 3 ते 6 या वेळेत लीओ सदस्य अनन्या बोरा, खुशबू माखिजा, समाईरा सबलोक, रीत कपूर, गुरनूर वधवा, दिशा तलवार, धारवी पटेल, तमन्ना तलवार, साईना सबलोक, प्रीत कंत्रोड, रुचिता कुमार यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले.


या दीपोत्सवात ट्रील कलेक्टिव अकॅडमीच्या आर्केस्ट्राने शोभा वाढवली. कलाकारांनी हिंदी, मराठी गाण्यासह धार्मिक, देशभक्ती व कव्वालीच्या सुमधूर गीतांचा नजराणा सादर केला. उपस्थितांनी या मैफलचा मनमुराद आनंद घेतला. तर कार्यक्रम रंगात आल्यावर डिजेच्या तालावर बालगोपालासह उपस्थित पाहुण्यांनी मराठी व हिंदी गीतांवर ठेका धरला होता. या मेळाव्यात मुलींनी हातावर मेहंदी, मुलांनी टॅटू काढून विविध खेळांचा आनंद लुटला.


यावेळी घेण्यात आलेल्या किल्ला बनवा व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आले. संध्याकाळी स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता. तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाले. या धमालमय कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना वडा पाव, खाऊ, चॉकलेट, आईस्क्रिमसह भोजनाची मेजवाणी होती. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. अमोरा वधवा यांनी या प्रसंगी प्रत्यक्ष दिवाळीचे चित्र रंगवून कार्यक्रमात रंग भरला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल परमार आणि रुपेश पासपुल यांनी केले. आभार लायन धनंजय भंडारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील छाजेड, हरजीतसिंह वधवा, प्रशांत मूनोत, दिलीप कुलकर्णी, किरण भंडारी, कमलेश भंडारी जस्मितसिंह वधवा, डॉ. अनघा पारगावकर, डॉ. संजय असनानी, डॉ. अमित बडवे, डॉ. मानसी असनानी, मधु भंडारी, प्रिया बोरा, सहेजकौर वधवा, अनुष्का सुकाळे आदींसह घर घर लंगर सेवा, स्नेहालय परिवार, बाल कल्याण समिती यांनी परिश्रम घेतले. यावेळी स्नेहालयचे संजीव गुगळे, श्यामा असावा, बाबा नगरवाला, हनीफ शेख आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *