अहमदनगर (प्रतिनिधी)- लाच मागणीच्या कारवाईत सापळा रचन्यासाठी वापरलेल्या शासकीय डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर व त्यातील मेमरी कार्ड बळजबरीने घेऊन गेलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या त्या पोलीस कर्मचार्यास नुकताच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये 17 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात 16 फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई वेळी कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी एकनाथ निपसे यांनी सदर फिर्यादीतील फिर्यादीच्या मुलाला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागितली होती. व लाच मागणी पडताळणी दरम्यान सदर पोलीस कर्मचारी यास फिर्यादीबाबत संशय आल्याने त्यांनी फिर्यादीकडे दिलेला शासकीय डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर व त्यातील मेमरी कार्ड असे 7 हजार रुपये किमतीची वस्तू फिर्यादी यांच्या ताब्यातून धक्काबुक्की करून घेऊन गेल्याचे फिर्याद नोंदविली होती.
सदर घटनेत पोलीसांनी निपसे यांना अटक केली. निपसे यांच्या वतीने अॅड. सरिता एस. साबळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात आरोपीच्या वतीने बाजू मांडताना फिर्यादी तक्रारदार यास सतत खोट्या तक्रारी करण्याची सवय आहे. फिर्यादी व पंच साक्षीदारांचे जबाबामध्ये विसंगती आढळून येत आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. तसेच लाचेची मागणी पडताळणी करण्याची प्रक्रिया योग्यरीत्या पूर्ण केलेली नाही. अशा अनेक कारणामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद न्यायालया समोर करण्यात आला. अॅड. साबळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने एकनाथ निपसे यांचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड. सरिता एस. साबळे व अॅड. सतीश परमेश्वर गीते यांनी काम पाहिले.