गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन मारहाण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
जनावरे खरेदी-विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहने अडवून मारहाण होत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- खरेदी-विक्रीसाठी जनावरांची वाहतूक करणार्यांना गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन वारंवार होणार्या मारहाण व दहशतीच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात आले. तर कायदा हातात घेऊन परस्पर वाहने अडवून बेदम मारहाण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या उपोषणात रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहरकार्याध्यक्ष दानिश शेख, युवक शहर जिहाध्यक्ष आवेझ काझी, ओबीसी शहराध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष अझीम खान, संदीप वाकचौरे, आदिल शेख, नईम शेख, मुन्ना भिंगारदिवे, हुसेन चौधरी, अयाज कुरेशी, एजाज कुरेशी, मोहसिन कुरेशी, अन्वर कुरेशी, अन्नू कुरेशी, शादाब कुरेशी आदी सहभागी झाले होते.
गो हत्या बंदी कायद्यानुसार पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये जनावरे खरेदी-विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहने अडवून मारहाण करुन केली जात आहे. पोलीस प्रशासनापेक्षा हिंदुत्ववादी संघटना परस्पर कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.

अशा घटनेत सातत्याने वाढ होत असून, नुकतेच 20 फेब्रुवारी रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जनावरांची गाडी घेऊन जाणार्या चालकास काही गोरक्षकांनी बेदम मारहाण केली व त्याच्याकडील पैसे काढून घेतले. हा अधिकार गो रक्षकांना कोणी दिला?, कारवाई पोलीस प्रशासनाची का? गो रक्षकांची असा गंभीर प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची देखील शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन जनावरे खरेदी-विक्री करणार्यांना मारहाण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.