अण्णाभाऊंनी दुबळ्या घटकांच्या शोषणमुक्तीसाठी संघर्ष केला -अमित काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, भिंगार युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, आकाश सरोदे, भारत सुर्यवंशी, निताताई भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, गाव कुसाबाहेरील उपेक्षित वंचित व अस्पृश्यतेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला अण्णाभाऊ साठे यांनी दिशा दिली. तर या दुबळ्या घटकांच्या शोषणमुक्तीसाठी संघर्ष केला. समाज नवनिर्मितीसाठी शाहिरी, काव्य, पोवाडे लिखाणाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी समाजाला जागृत करुन अन्यायाची वाचा फोडली. विषमतेवर घाव घालून व्यवस्थेविरोधात दिन दुबळ्यांच्या कल्याणासाठी संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले.
अजय साळवे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अत्यल्प शिक्षणात तळागाळातील समाजासाठी लेखण्याच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करून परिवर्तन घडविण्यासाठी उभे आयुष्य त्यांनी खर्ची केले. शाहिरी, साहित्य, कांदबरी लेखन करून समाज सुधारणेचे त्यांनी केलेले अतुलनीय कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.