• Wed. Oct 15th, 2025

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचे शहरात स्वागत

ByMirror

Jul 22, 2023

महिलांनी जानकर यांचे केले औक्षण

जनस्वराज्य यात्रा कुणाच्या विरोधात नाही, शेतकरी, कामगार व युवकांना चांगले दिवस येण्यासाठी -महादेव जानकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय समाज पक्षाची यात्रा जनतेच्या हितासाठी असून, कुणाच्या विरोधात नाही. प्रादेशिक पक्ष शेतकरी, कामगार हितासाठी संघर्ष करत आहे. मोठमोठ्या पार्ट्या फक्त मोठ्या बाता करतात, छोट्या माणसांचे कामे करत नाही. छोटे प्रादेशिक पक्ष जनतेची कामे करण्याचा ध्यास घेतला आहे. ही जागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रा निघाली असल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले.


राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकर यांनी काढलेली जनस्वराज्य यात्रा शनिवारी (दि.22 जुलै) शहरात दाखल झाली. यावेळी महिला आघाडीच्या वतीने चांदणी चौकात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जानकर बोलत होते. याप्रसंगी महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर-भगत, आशा वाकळे, निर्मला केदारी, वर्षा आढाव, वैशाली कांबळे, सारिका सिद्दम, रुबीना शेख, फिरोजा दीदी, जयश्री कांबळे, रूपाली पगारे, महादेव भगत, मेहर कांबळे, महेंद्र कांबळे, संजय भिंगारदिवे, मुन्ना शेख, विजय पठारे, अमोल कांबळे, सागर जाधव आदींसह राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे जानकर म्हणाले की, पंढरपुरला विठ्ठलाला साकडे घालून गेल्या दहा दिवसापासून ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. शेतकरी सुखी व्हावा, कामगारांना दिवस चांगले यावे व युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रासह भारतभर विविध राज्यातून ही रथयात्रा मार्गक्रमण करणार आहे. ही यात्रा मार्गक्रमण करत असताना सर्व जनतेला जागृक करण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर-भगत म्हणाल्या की, समाजाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून होत आहे. महादेव जानकर यांच्या सक्षम नेतृत्वाने पक्षाची वाटचाल सुरु असून, जनस्वराज्य यात्रेने समाज जागृती होत असून, मोठा वर्ग पक्षाशी जोडला जात आहे. महिलांचे मोठे संघटन उभे करुन पक्षाला बळकट करण्याचे कार्य सुरु असून, जिल्ह्यात महिलांचे चांगले संघटन उभे राहिले असल्याचे, ते म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *