उत्कृष्ट कामगिरी करुन पदकांची कमाई
खेळाडूंच्या दमदार कामगिरीने महाराष्ट्र संघाने पटकाविला चॅम्पियन चषक
अहमदनगर (प्रतिनिधी)- 46 वी राष्ट्रीय व 3 री राज्यस्तरीय आर्मस्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (पंजा लढाव) पारनेरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन राष्ट्रीय व राज्य स्तरावर पदकांची कमाई केली. नुकतीच ही स्पर्धा मुंबई, विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडली. यामध्ये देशातील विविध राज्यातून तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन महाराष्ट्र संघाने चॅम्पियन चषक पटकाविला.
या स्पर्धेसाठी क्रीडा संकुलचे अध्यक्ष अरविंद प्रभू, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, मुंबई शिक्षण अधिकारी राजेश कंकल, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष जय गवळी, शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण, महिला आयोग सदस्य सुप्रदा फातर्पेकर, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, एमपीएससीमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आलेले संतोष पवार, या खेळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बिमल चंदा, राष्ट्रीय सचिव सुमित सुशीलन उपस्थित होते.

महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करताना किशोर मावळे (लोणी मावळा, ता. पारनेर) याने राष्ट्रीय स्तरावर रौप्य व राज्यस्तरावर कास्य, दिग्विजय शेंडकर (लोणी मावळा, ता. पारनेर) याने राष्ट्रीय स्तरावर कास्य व राज्यस्तरावर सुवर्ण, यश ठुबे (अळकुटी, ता. पारनेर) याने राष्ट्रीय व राज्यस्तरावर कास्यपदक पटकाविले. तिन्ही खेळाडूंना अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कडलग यांचे मार्गदर्शन लाभले. तर सदर खेळाडू पारनेर आर्मस्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रशिक्षक मनिष आवारी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र आर्म स्पोर्ट्स असोसिएशन कमिटीचे सचिव अरविंद चव्हाण, खजिनदार राजेश गाडगे, उपसचिव रितेश दाभोलकर, उपखजिनदार विभावली सापळे, टेक्निकल डायरेक्टर गीता ताई झगडे आदींनी परिश्रम घेतले.
