बुधवारी सावेडीला रंगणार फुटबॉलचा प्रदर्शनीय सामना
नवोदित फुटबॉल खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षणासाठी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी व एटी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू व एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाला गुलमोहर फुटबॉल क्लबच्या मैदानावर प्रारंभ झाले. अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीने एटी फाऊंडेशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाला शहरातील फुटबॉल खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील मुला-मुलींना फुटबॉल खेळाप्रती आवड निर्माण करणे, या खेळात खेळाडूंना असलेल्या विविध संधी, विविध माहितीसह आधुनिक तंत्रशुध्द माहिती देण्याच्या उद्देशाने पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर या प्रशिक्षणात मुला-मुलीना अॅक्टिव्हिटीद्वारे नेतृत्व व खेळाचे कौशल्ये कसे विकसित करायचे? याचे प्रशिक्षण देण्यात आले. धावत्या आणि स्पर्धामय युगात मुला-मुलींचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी तुरंबेकर व्यायाम व आहार विषयावर खेळाडूंसह पालकांना देखील मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षण वर्गाचा समारोप बुधवारी (दि.5 एप्रिल) फुटबॉलच्या प्रदर्शनीय सामन्याने होणार असल्याची माहिती शिबिराच्या संयोजिका तथा एडीएफएच्या सदस्या पल्लवी सैंदाणे यांनी दिली. प्रशिक्षण वर्गात तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या प्रशिक्षिका भक्ती पवार, शहरातील स्थानिक प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, सुभाष कनोजिया, सिचन पाथरे, फारुक शेख, अभिषेक सोनवणे, अक्षय बोरडे, जॉय जोसेफ आदी सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.
या फुटबॉल प्रशिक्षण वर्गाला अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, गुलमोहर फुटबॉल क्लबचे अध्यक्ष तथा उद्योजक जोएब पठाण, उपाध्यक्ष डॉ. प्रताप पठारे, एएसआयचे व्हिक्टर जोसेफ यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर कोल्हापूरची माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू असून, त्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. एएफसी ए परवाना मिळवणार्या त्या भारतातील सर्वात तरुण प्रशिक्षिका आहेत. तर भारतातील पहिल्या महिला एएफसी पॅनल सदस्या आणि तांत्रिक तज्ञ असून, देशातील प्रशिक्षकांना शिक्षण देणार्या पहिल्या महिला आहेत. मेन्स क्लबच्या तांत्रिक संचालक म्हणून कार्य करणार्या त्या आशियातील पहिल्या महिला म्हणून ओळखल्या जातात. मागील 15 वर्षाहून अधिक काळ फुटबॉल क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू घडले आहेत. महिलांनाच नाहीतर युवकांना देखील त्या प्रशिक्षण देतात.