जिल्हा बँकेतून पगार मिळण्यास उशीर व इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोप
शिक्षणाधिकारी यांना माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे मासिक पगार पूर्वीप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेतूनच अदा करण्याच्या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतन पथक अधीक्षक संध्या भोर यांना देण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव सांगळे, संगमनेरचे तालुकाध्यक्ष प्रदीप कांबळे, संजय जाधव, दिनेश थोरात, अशोक घोडे, सर्जेराव वाघ, भाऊसाहेब जीवडे, गोवर्धन पांडूळे, संभाजी पवार, कैलास मोकळे, बाळासाहेब निवडूंगे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वेतन पथकाच्या वतीने काही दिवसांपूर्वी माध्यमिक शिक्षकांचे पगार जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अदा होण्याबाबतचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. मागील दोन वर्षभरापासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे पगार हे महिन्याच्या 1 तारखेलाच राष्ट्रीयकृत बँकेतून अदा करण्यात येत होते. ज्या कर्मचार्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत पगार केले जातात अशा शिक्षकांना राष्ट्रीयकृत बँकेचे पगारदार खातेदार म्हणून अनेक प्रकारच्या सुविधा तसेच विमा सुरक्षा पुरविल्या जातात.
मात्र जिल्हा बँकेतून 1 तारखेला पगार मिळणे शक्य होणार नाही, तसेच पगारदार खातेदारास राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे कोणत्याच सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट करुन माध्यमिक शिक्षक संघाने जिल्हा बँकेतून पगार करण्यास आक्षेप घेतला आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेतूनच पगार करण्याची मागणी लावून धरली आहे.