दीन-दुबळ्या समाजाला शिक्षणाने महात्मा फुले यांनी दिशा दिली -अॅड. प्रणाली चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- रायझिंग युथ अॅण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने जिल्हा न्यायालय, झारेकर गल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अॅड. प्रणाली चव्हाण, अॅड. गौरी सामलेटी, अॅड. मनिष केळगंद्रे, अॅड. अविनाश खामकर, अॅड. अनिता दिघे, अॅड. श्याम आसवा, अॅड. पोपट चव्हाण, अॅड. ज्ञानेश्वर दाते, अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. अक्षय नजन, संतोष कांडेकर, प्रशांत मुनोत, सागर आलचेट्टी, अॅड. सारिका झरेकर, अॅड. निखील चव्हाण आदी उपस्थित होते.
अॅड. प्रणाली चव्हाण म्हणाल्या की, जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दीन-दुबळ्या समाजाला शिक्षणाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिशा दिली. त्याग, आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील. स्त्री शिक्षणाबद्दल शब्दही काढणे पाप मानले जात असताना त्या काळात त्यांनी सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्रियांसाठी शाळा काढली. तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देण्याचे महान कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. गौरी सामलेटी म्हणाल्या की, समाजात विषमता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. शिक्षणाने बहुजन समाजाला जागरुक करण्याचे काम त्यांनी केले. महिलांना सुशिक्षित करुन त्यांनी समाजाला दिशा देण्याचा दृष्टीकोन साध्य केला. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, याचे श्रेय फुले दांम्पत्यांना जात असल्याचे त्यांनी सांगितले.