भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. माता की चौकी कार्यक्रमात राजेश अलग ग्रुपच्या कलाकारांनी देवीचे एकाहून एक सरस भक्तीगीते सादर केली. वाद्यांसह भक्तीगीतांवर बहरलेल्या कार्यक्रमाचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी शीख, पंजाबी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रात्री रंगलेल्या माता की चौकीमध्ये भाविकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. पावसाच्या संतधारेत झालेल्या कार्यक्रमाचा उत्साह मात्र शिगेला पोहचला होता. हात उंचावून भाविकांनी देवी मातेचा जयजयकार केला.
आयान विवेक गुप्ता या चिमुकल्याने श्लोक सादर करुन भाविकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे यजमान प्रमोद चड्डा व विरेंद्र ओबेरॉय यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर शाखेच्या वतीने डॉ. गुलशन गुप्ता यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. भंडार्याने कार्यक्रमाची सांगता झाली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व गाभार्याभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
