बास्केटबॉल स्पर्धेचा थराराने रंगले चुरशीचे सामने
शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक -इंजि. केतन क्षीरसागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी उत्साहात पार पडली. अहमदनगर डिस्ट्रिक्ट अॅम्युचर हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या निवडचाचणीत बास्केटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. जिल्ह्यातील अनेक बास्केटबॉल संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. यावेळी अत्यंत चुरशीचे सामने रंगले होते.

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष पियुष लुंकड, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, सहसचिव चंद्रशेखर म्हस्के, खजिनदार सत्येन देवळालीकर, सचिव मुकुंद काशिद आदींसह खेळाडू उपस्थित होते.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, जिल्ह्यातून विविध क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू पुढे येत आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नांव उज्वल करीत आहे. कोरोनामुळे सर्वच खेळाच्या स्पर्धा होऊ न शकल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. स्पर्धांना सुरुवात झाली असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. बास्केटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी असोसिएशनला वेळोवेळी सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.

प्रास्ताविकात उपाध्यक्ष योगेश चव्हाण यांनी बास्केटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट अॅम्युचर हौशी बास्केटबॉल असोसिएशन राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सहसचिव चंद्रशेखर म्हस्के यांनी पाहुण्यांचे व खेळाडूंचे स्वागत केले. अध्यक्ष पियुष लुंकड यांनी पराभव झालेल्या संघाने खचून न जाता, पुढील काळात आपल्याला विजय मिळण्यासाठी ध्येय निश्चित करुन वाटचाल करावी. विजयासाठी जिद्दीने खेळ खेळत राहावे, शारीरिक तंदुरुस्तीसाठी हा खेळ उपयुक्त असल्याचे सांगून, स्पर्धेची माहिती दिली.
या स्पर्धेतून अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. हा संघ कोल्हापूर येथे 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होणार्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. खजिनदार सत्येन देवळालीकर यांनी आभार मानले.
