रोजगार मेळाव्यातून महिला सशक्तीकरणाचा संदेश
विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन व मराठा समन्वय परिषद हिरकणी ग्रुपचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या राज्यातील कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन व मराठा समन्वय परिषद हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. तर महिला रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला.

माऊली सभागृहात मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे संयोजक तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे, नोबेल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. संगीता कांडेकर, अलकाताई मुंदडा, उद्योजिका संगीताताई गुरव, करुणा मोरे, रेश्मा आठरे, मनिषा मोरे, प्रतिभा ठाकरे आदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात अनिताताई काळे म्हणाल्या की, महापुरुषांच्या त्यागमय कार्याने सुखाचे छत्र सर्वांना मिळाले आहे. या उपकाराची परतफेड होणे अशक्य असली तरी, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. आजच्या मातेने राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेऊन मुलांवर शिवरायांप्रमाणे संस्कार घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवून विविध क्षेत्रातील 25 कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्याताई गडाख म्हणाल्या की, वात्सल्याचा झरा व मायेचे रुप म्हणजेच स्त्री आहे. कौटुंबिक कार्य असो, किंवा सामाजिक ती नेहमीच स्वत:ला झोकून योगदान देत असते. महिलांच्या सामाजिक व कार्यकर्तृत्वाने समाज सावरला गेला आहे. महिलांनी आर्थिक सक्षम झाल्यास कुटुंबासह समाजाची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या महापुरात दुर्गम भागातील अनेक ग्रामस्थांचे जीव वाचविणारे वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) अग्निशमन दलाला या वर्षीचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख मोहन मुंगसे त्यांच्या सहकार्यांसह पुरस्कार स्विकारला. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. डोक्यावर तुरेदार फेट्यामुळे पुरस्कार प्राप्त महिला रुबाबदार दिसत होत्या. महिलांचा सन्मान होताना उपस्थितांनी त्यांना त्यांच्या कार्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन पुरस्कार्थींचा सन्मान करण्यात आला.

प्रारंभी अनिताताई काळे यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी बचत गटाचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या यामधील प्रथम महिला विजेत्यास पैठणी, द्वितीय विजेत्यात सोन्याची नथ व तृतीय बक्षीस चांदीची जोडवे देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी जाधव, अर्चना एखंडे, सुनंदा नागुल, मायाताई हराळ, इंदुताई गोडसे, सारिका खांदवे, प्रतिभा भिसे, किशोरी भोर, मीरा बेरड, वैशाली उदावंत, आशा गायकवाड, हिरा शहापूरे, ज्योती कदम, डॉ. ऐश्वर्या शहा, मीनाक्षी वाघस्कर आदींनी परिश्रम घेतले.
