खेळाडू घडविणार्या क्रीडा शिक्षकांचा सहभाग
13 विविध खेळांचा तीन दिवस रंगणार थरार
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मास्टर्स गेम्सला जिल्ह्यातील कोकमठाण, येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्र खेलो मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या खेलो मास्टर्स गेम्स फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष रामसिंग राठोर यांच्या हस्ते झाले.
यावेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, प्रकाश भट, अर्जुन पुरस्कार्थी शुभम वनमाळी, राज्य शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, विवेकानंद महाराज, डॉ. गुरुपाल सेठी, श्री संदीप घायडे, महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव आंतरराष्ट्रीय धावपटू अमन चौधरी, खजिनदार सुनिल हामंद, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, खेलो मास्टर्स सचिव संदिप घावटे, शिवछत्रपती पुरस्कार्थी सर्वश्री वनमाळी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी नितिन चवाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने झाली. स्पर्धेचे प्रास्ताविक राज्य सचिव अमन चौधरी यांनी केले. आत्मा इंटरनॅशनल स्कुलचे विद्यार्थी यांनी वाद्यवृंदासह स्वागतगीत व स्पोर्ट्स डान्सचे सादरीकरण केले. स्पर्धेत अॅथलेटिक्स, कुस्ती, व्हॉलीबॉल, स्विमिंग, रायफल शूटिंग, टेबलटेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, नेटबॉल, खो-खो या 13 खेळाचा समावेश आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मा मालिक ध्यानपीठ आश्रमच्या क्रीडा विभागाचे अधिकारी व क्रीडाशिक्षक परिश्रम घेत आहे. स्पर्धेत विविध वयोगटात राज्यातील असंख्य महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी सुसज्ज व प्रशस्त अशी मैदाने तयार करण्यात आली असून, चहा, नाश्ता, भोजनासह निवासाची भव्यदिव्य व्यवस्था आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या धरतीवरील आयोजनाने तीन दिवस विविध स्पर्धेचा थरार रंगत आहे. या स्पर्धेतून विजेत्या खेळाडूंची मध्यप्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय खेलो मास्टर्स स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
फीट इंडियातंर्गत शिक्षकांसाठी खेलो मास्टर्स गेम्स व्यासपीठ
भारत सरकारच्या फीट इंडिया उपक्रमांतर्गत 30 वर्षे पुढील वयोगटासाठी या स्पर्धा आहे. देशाचे भवितव्य असणारे खेळाडू घडविणार्या क्रीडा शिक्षकांना स्वतःचेही कर्तृत्व सिद्ध करता यावे, म्हणून महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने खेलो मास्टर्स गेम्सच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शिक्षकांनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. -राजेंद्र कोतकर (अध्यक्ष, म.रा. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, उपाध्यक्ष, खेलो मास्टर्स गेम्स असो. महाराष्ट्र)

