जिल्ह्याच्या संघाचे करणार प्रतिनिधित्व
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षा खालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी नुकतीच पार पडली. यामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठच्या 5 मुलींची निवड करण्यात आली. या मुली राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा लवकरच पुणे येथे होणार असून, यामध्ये जिल्ह्याच्या संघात स्वामिनी जेजुरकर, ऐश्वर्या चौरसिया, पोर्णिमा पाटोळे, तनुजा जाधव आणि वृषाली पारधी या मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या मुली उत्कृष्ट क्रिकेटच्या खेळाडू असून, उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांचा सराव सुरु आहे.
या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव महानंद माने व मुख्याध्यापिका आशा धनवटे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच 17 वर्षे वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल अक्षदा बेलेकर हिचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या खेळाडूंचा अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील, खजिनदार महेश धाडगे, उपमुख्याध्यापक अरुण तुपविहिरे, पर्यवेक्षक बाळासाहेब डोंगरे व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे. क्रिकेट स्पर्धेतील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक घनश्याम सानप व संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
