प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिला सदस्यांनी केला सत्कार
उपक्रमशील शिक्षिका काळे यांचे कार्य प्रेरणादायी -आशाताई फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल व मराठा समन्वय परिषदेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया यांच्या हस्ते काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी स्मिता पोखर्णा, मधू जग्गी, अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, विद्या बडवे, ज्योती कानडे, जयश्री पुरोहित, शकुंतला जाधव, उज्वला बोगावत, शोभा पोखर्णा, शशीकला झरेकर, सुजाता पुजारी आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आशाताई फिरोदिया म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भावी पिढीला शिक्षणाने सुसंस्कारी करुन त्या समाज घडविण्याचे कार्य करत आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार व त्यांची झालेली नियुक्ती शहरातील ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, अनिता काळे ग्रुपच्या उपाध्यक्षा असून, त्यांनी मिळवलेले यश सर्व ग्रुपच्या सदस्यांच्या दृष्टीने गौरवास्पद गोष्ट आहे. त्या शिक्षिका असल्या तरी सर्व महिलांना बरोबर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांना यापुर्वी देखील विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून, त्या सामाजिक क्षेत्रात गत दोन दशकापेक्षा जास्त काळापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. त्या गरजू घटकातील विद्यार्थी व महिलांना आधार देण्याचे त्यांचे कार्य सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. विविध महिलांच्या संघटनेत त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सत्काराला उत्तर देताना काळे यांनी कुटुंबातील व्यक्तींनी केलेला सन्मान हा मोठा असून, या सत्काराने भारावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.