जीवनधारा प्रतिष्ठानची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन महापालिकेच्या माध्यमातून त्वरीत रस्त्याचे काम पूर्ण करुन देण्याचे म्हंटले आहे.

गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम हाती घेण्यात आलेले आहे. मात्र अनेक महिन्यापासून या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्याची एक बाजू तीन ते चार फुटा पर्यंत खोदण्यात आली आहे.
तसेच महापालिकेने जलवाहिनीच्या स्थलांतराचे काम हाती घेतले असून, नुकतेच फुटलेल्या जलवाहिनीमुळे खोदलेल्या रस्त्याची कॅनॉल सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी दिली.
या कामाचे योग्य नियोजन करुन तातडीने रस्त्याचे काम हाती घेऊन पूर्ण करण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.