• Sat. Mar 15th, 2025

रस्ता खुला करुन देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी उपोषण

ByMirror

Jan 28, 2023

खानापूरला पाच महिन्यापासून राजकीय दबावापोटी रस्ता बंद केल्याचा आरोप

तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील ग्रामपंचायतीकडून कारवाईस टाळाटाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. यामध्ये अंतोन गायकवाड, सदानंद गायकवाड, मयुरी गायकवाड, करण गायकवाड, अर्जुन गायकवाड आदी सहभागी झाले होते.


या उपोषणाची दखल घेऊन जिल्हादंडाधिकारी गृह शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक व तहसिलदार यांना तक्रारीचे अवलोकन करुन नियमानुसार कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.


माजी सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांनी खानापूर (ता. शेवगाव) येथील गायकवाड यांच्या हॉटेलची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी देऊन जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केला होता. उपोषणानंतर याप्रकरणी दि.28 ऑगस्ट शेवगाव पोलीस स्टेशनला माजी सरपंच अण्णा शाहू जगधने, आजिनाथ अण्णा जगधने, रवी रामनाथ जगधने, राजू रामनाथ जगधने, काकासाहेब शाहू जगधने, एकनाथ दगडू जगधने, सोमनाथ रामनाथ जगधने व किसन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र शारदा गायकवाड यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदरील रस्ता राजकीय दबावापोटी अद्यापि खुला करुन देण्यात आलेला नाही. हा रस्ता जेसीबीने मोठी चर खोदून, काटे टाकून व पत्रे लावून बंद करण्यात आलेला आहे. सदरील रस्ता खुला करण्यासाठी वेळोवेळी पोलीस व महसुल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.

याबाबत तहसिलदार यांनी ग्रामपंचायत स्तरावरुन कारवाई होण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *