• Thu. Mar 13th, 2025

रणरणत्या उन्हात उसाच्या रसाचा गाडा चालविणार्‍या महिलांना सनकोट, टोपी व चप्पल भेट

ByMirror

Apr 6, 2023

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम

सामाजिक संवेदनेने घेतलेला उपक्रम प्रेरणा देणारा -मिनाताई मुनोत

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाच्या वाढत्या कडाक्यात रणरणत्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या रसाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या महिलांना प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सनकोट, टोपी व चप्पलची भेट देण्यात आली. दिवसभर उन्हामध्ये हैराण झालेल्या नागरिकांना थंड गोड उसाचा रस पाजून तहान भागवण्याचे काम करणार्‍या महिलांना प्रेमापोटी मिळालेली ही अनोखी भेटीने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


मार्च महिना संपून गारवा लुप्त झाला असून, एप्रिल व मे मधील उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. कडक उन्हाचे चटके सर्वत्र जाणवत असताना, उष्मामुळे उसाच्या रसाला प्रचंड मागणी आहे. मात्र अनवाणी पायी, डोक्यावर टोपी नसलेल्या महिला या रसाचा गाडा ओढतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते. या महिलांचा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी हा आगळा-वेगळा उपक्रम शहरात राबविण्यात आला.


या कार्यक्रमासाठी नगरसेविका संध्या पवार, माजी नगरसेविका मनिषा भागानगरे, मर्चंट बँकेच्या संचालिका मिनाताई मुनोत, सविता मोरे, अ‍ॅड. निलीमा औटी, गितांजली भागानगरे, विद्या बडवे, स्वाती गुंदेचा, सविता गांधी, उषा सोनी, जयश्री पुरोहित, अलका मुंदडा, शकुंतला जाधव, हिरा शहापूरे, शशीकला झरेकर, ज्योती कानडे, अनिता काळे, पूजा चौहान, सुजाता पुजारी, शोभा पोखरणा आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


नगरसेविका संध्या पवार म्हणाल्या की, महिलांनी महिलांसाठी चालवलेली सामाजिक चळवळ दिशादर्शक आहे. दिवस भर उन्हात भटकंती करुन उसाच्या रसाचा गाडा चालवून दांम्पत्य आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. यामध्ये महिला रणरणत्या उन्हात कष्टाचे काम करत असताना त्यांना प्रयास व नम्रता दादी-नानीची मिळालेली भेट कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मिनाताई मुनोत यांनी सामाजिक संवेदनेने घेतलेला उपक्रम प्रेरणा देणारा आहे. कष्ट करणार्‍या महिलांची जाणीव ठेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाच्या संघर्षाला आधार देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून महिलांसाठी प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. वर्षभर महिलांसाठी या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली.
यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिस, तर सर्व उपस्थित महिलांना मलाबार ज्वेलर्सच्या वतीने भेट वस्तू देण्यात आल्या.

माहेश्‍वरी समाजाचे अध्यक्षा राजश्री मुंदडा-इंगोले व सुवर्णा शेलार यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. मंगल तापडिया (परभणी) यांनी सादर केलेल्या भजनात महिला तल्लिन झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कुलकर्णी व दिप्ती मुंदडा यांनी केले. आभार विद्या बडवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *