खेलो मास्टर राज्यस्तरीय स्पर्धेत तीन सुवर्ण पदकाची कमाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील क्रीडा शिक्षक मेजर संदीप दरंदले यांनी खेलो मास्टर राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन तीन सुवर्णपदकाची कमाई केली. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव येथे नुकतीच पहिली खेलो मास्टर राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. यामध्ये राज्यातील क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. मेजर संदीप दरंदले यांनी 100 मीटर व 200 मीटर धावणे व गोळाफेक या तिन्ही खेळात वर्चस्व गाजवत सुवर्णपदकाची कमाई केली.
त्यांची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मेजर दरंदले शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर एवरेस्ट अकॅडमीत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देतात. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

