त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मुस्लिम समाजाची मागणी
गुन्हा दाखल करण्याचे पोलीस प्रशासनाचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा देशात लागू होण्यासाठी शहरात बुधवारी (दि.14 डिसेंबर) सकल हिंदू समाजाच्या वतीने निघालेल्या हिंदू जन आक्रोश मार्चात मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण व जातीवाचक उद्गार काढणार्या शिवसेनेच्या त्या महिला पदाधिकारीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.
हिंदू जन आक्रोश मोर्चात माध्यमांना मुलाखत देताना त्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारीने मुस्लिम समाजातील युवकांना उद्देशून द्वेषपूर्ण व जातीवाचक वक्तव्य केले. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडीयात काही वेळातच व्हायरल झाल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या वक्तव्याचा समाजातून निषेध करण्यात आला आहे. तर मोर्चाचा उद्देश एका विशिष्ट प्रवृत्तीशी असताना संपूर्ण समाजाला वेठीस धरुन बदनामी केली जात असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम समाजात उमटत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात मुस्लिम समाजाचे निवेदन स्विकारुन पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी उपस्थित युवकांच्या जमावाला अशा प्रवृत्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. समाजातील एकोपा तोडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास ते हाणून पाडण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला संध्याकाळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

