• Fri. Mar 14th, 2025

मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

ByMirror

Jul 6, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.


21 डिसेंबर 2021 रोजी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपींनी अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केल्याचा आरोप होता. पोलिसांच्या तपासात असे झाले होते की, आरोपीने पिडीतेला राहत्या घरातून रात्रीच्या वेळेस अपहरण करून पळून नेले होते. त्यानंतर आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध तिला डांबून ठेवून वारंवार बलात्कार केला. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले की, आरोपीने वारंवार केलेल्या बलात्कारामुळे पिडीत महिला गरोदर राहिली होती. पोलिसांनी तिच्या पालकांच्या मदतीने पिडीतेला आरोपीने अपहरण केलेल्या ठिकाणावरून घेतले असता पिढीतेने पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला.


त्यानंतर पोलिसांनी पीडीतेची वैद्यकीय तपासणी केली असता, पिडीत गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली व पिडीतेच्या गर्भाचे व आरोपीचे डीएनए नमुने वैद्यकीय तपासणीसाठी घेतले. तपासणी दरम्यान आरोपीमुळेच पिडीता गर्भवती झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपासांती विशेष सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.


सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करणे कामी एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये पीडीतीची साक्ष सर्वात महत्त्वाची होती. त्यानुसार आरोपीतर्फे अ‍ॅड. परिमल फळे यांनी साक्षीदारांचे उलट तपास घेतले. त्यामध्ये अ‍ॅड. फळे यांनी पीडीतेचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला. त्यानुसार आरोपीतर्फे परिमल फळे यांनी हा गुन्हा त्यांच्या अशिलांनी केलेला नसल्याचा बचाव केला. अ‍ॅड. फळे यांनी साक्षीदारांचे घेतलेले उलट तपास व न्यायालय समोर केलेला युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश पी.आर. देशमुख यांनी ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यासाठी अ‍ॅड परिमल फळे यांना अ‍ॅड. सागर गायकवाड, अ‍ॅड. अभिनव पालवे, अ‍ॅड. डोके, लांडगे, अ‍ॅड. अक्षय कुलट यांनी सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *