• Thu. Oct 16th, 2025

मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या प्रकरणात त्या रेल्वे पोलीसांवर 302 प्रमाणे वाढीव कलम लावावे

ByMirror

Aug 11, 2023

तर मयत युवकाच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करुन न्याय देण्याची रिपाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे पोलीसांच्या मारहाणीत मयत झालेला तरुण विशाल धेंडे यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करुन न्याय द्यावा व त्याला मारहाण करणारे रेल्वे पोलीस कर्मचारी व त्यांच्या साथीदारांवर 302 प्रमाणे खूनाचा वाढीव कलम लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने करण्यात आली आहे.


या मागणीचे निवेदन रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस उपाधीक्षक लोहमार्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. यावेळी रिपाईचे नेते संजय कांबळे, कर्जत तालुका अध्यक्ष संजय भैलुमे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, खादी ग्रामोद्योगचे व्हाईस चेअरमन रोहन कदम, बाळासाहेब शिंदे, नागनाथ धेंडे, विजय भैलुमे, विनोद थोरात आदींसह धेंडे परिवारातील कुटुंबीय उपस्थित होते.


31 जुलै रोजी विशाल नागनाथ धेंडे या तरुणास अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू जबाबदार असणारा रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन वाकसे व करण (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखला झाला. मात्र या मृत्यूला जबाबदार असणारे सदर आरोपी व त्यांच्या सोबत असणारे इतर रेल्वे पोलीस कर्मचारी यांच्यावर 302 प्रमाणे खूनाचा वाढीव कलम लावून कठोर कारवाई करावी, तसेच मयत तरुणांच्या आई-वडिलांची फिर्याद दाखल करून घेऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मयत धेंडे हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. त्या कुटुंबास नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून 50 लाखाची मदत मिळावी, त्याची पत्नी पूजा विशाल धेंडे यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचीही मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास रिपाईच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *