जय दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्ण व पिडीत महिलांसह जय दुर्गामाता महिला मंडळाने महिला दिन साजरा केला. या वंचित महिलांचा सांभाळ करुन त्यांचे पुनर्वसन करणार्या अरणगाव रोड येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पात हा आगळा-वेगळा कार्यक्रम रंगला होता.
जय दुर्गामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखाताई भोसले यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात मानवसेवा प्रकल्पातील महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. प्रणाली चव्हाण, अॅड. गौरी सामलेटी, पूजा कोटेचा आदी महिला उपस्थित होत्या.
सुरेखाताई भोसले म्हणाल्या की, शहाणी म्हणवणारी व्यवस्था ठिकठिकाणी शहरात, गावखेड्यात, रस्त्यावर बेवारस मनोरुग्ण, निराधार व गंभीर आजारांनी त्रस्त महिलांना मरण्यासाठी सोडून देत आहे. अशांसाठी मानवसेवा प्रकल्प अतिशय तळमळीने कार्य करत आहे. या वंचित घटकातील महिलांना महिला दिनी आधार देण्याच्या उद्देशाने जय दुर्गामाता महिला मंडळाने त्यांच्या समवेत महिला दिनाचा आनंद द्विगुणीत केल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. प्रणाली चव्हाण यांनी महिला दिनी सर्वच महिलांचे सेलिब्रेशन सुरु असते, मात्र त्यांनी वंचित घटकातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे. महिला महिलांना आधार देण्यासाठी धावून आल्यास परिस्थिती बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
