न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अपहरण करुन केडगावचे फ्लॅट नावावर केल्याचा विश्वजित कासारचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशान्वये शहरातील त्या गुंडांवर तात्काळ गुन्हे दाखल होण्याचे आदेश देण्याची मागणी वाळकी (ता. नगर) येथील विश्वजीत कासार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
विश्वजीत कासार यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात 12 फेब्रुवारी 2020 रोजी क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली होती. यामध्ये शहरातील माजी नगरसेवक, त्याचा भाऊ, मुलगा व इतर पाच ते सात व्यक्तींनी रिव्हॉलवरमधून फायरींग करुन खंडणीसाठी अपहरण केले असल्याचा कासार यांचा आरोप आहे. सदर आरोपीपैकी एकाने महानगरपालिका हद्दीतील मौजे केडगांव येथील फ्लॅट नावावर करुन घेतले. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कोतवाली पोलीसांनी जबाब घेवून सदर आरोपींवकायदेशिर गुन्हा दाखल करुन कारवाई करणे संदर्भात आदेशीत केलेले असल्याचे कासार यांनी स्पष्ट केले आहे.
या आदेशानंतर कोरोना महामारीची साथ पसरल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान माझ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल होवून मला त्यात अटक झालेली असल्याने मला पोलीस स्टेशनला जावून जबाब देता आलेला नाही. यामुळे सदर लोकांवरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे फौजदारीग गुन्हे दाखल आहेत. काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुध्दा झालेली आहे. सदरचे आरोपी इसम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, या सदर इसमाविरुध्द सुमारे 20 पेक्षा जास्त खुना सारखे गंभीर गुन्हे दाखल असतांना त्यांच्या विरुध्द बोलण्याचे कोणी धाडस करत नाही.
सदरील आरोपी प्रत्येक गुन्हा करतांना स्वत: जवळ असलेल्या बेकायदेशिररित्या रिव्हॉलव्हरचा वापर करुन दहशत निर्माण करतात व जिवे मारण्याचा प्रयत्न करतात. या आरोपींवर राजकिय नेत्यांचा वरदहस्त असल्याकारणामुळे त्यांच्या विरुध्द कायदेशिर कारवाई झालेली नाही. मी जामीनावर सुटून आलो असल्याने हस्तकांमार्फत माझ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असतात. या आरोपींकडून जिवीतास धोका निर्माण झाला असल्याचे कासार यांनी निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी विश्वजित कासार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.