जन शिक्षण संस्था व राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेचा उपक्रम
पाच दिवसीय कार्यशाळेत महिलांना उद्योग-व्यवसायाची ब्रॅण्डिंग, पॅकिंग, मार्केटिंग, भांडवल उभारण्याचे मार्गदर्शन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना कौशल्यक्षम प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जन शिक्षण संस्था व राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेच्या (निसबड) संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पाच दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेचा समारोप क्षेत्र भेटीने झाला. शहरातील महिला व युवतींनी छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वीपणे उभे केलेल्या महिलांच्या विविध व्यवसाय व उद्योजक क्षेत्राला भेट देऊन त्यांच्या यशाचे गमक जाणून घेतले.
या क्षेत्रभेट प्रसंगी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, नोएडा येथील निसबड संस्थेच्या दिव्या अग्रवाल, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, छत्रपती संभाजीनगर जन शिक्षण संस्थेचे संचालक रणधीर गायकवाड, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे, रजनी खंदारे, पौर्णिमा कुलकर्णी, भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे नितीन राठोड आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील 31 महिलांची निवड करण्यात आली होती. जन शिक्षण संस्थेच्या शहरातील मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यशाळेत महिलांना उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उत्पादने, ब्रॅण्डिंग, आकर्षक पॅकिंग, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, डिजीटल मार्केटिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट, कर्ज प्रकरण, भांडवल उभारणे आदी विषयावर तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमातंर्गत प्रशिक्षणार्थी महिला, युवतींना छत्रपती संभाजीनगर येथील अद्यावत सलून, पार्लर व अकॅडमी, फर्निचर फॅक्टरीला भेट देऊन त्यांचा सुरु असलेल्या व्यवसायाची माहिती घेतली. तर तेथील जन शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन जूट उत्पादन प्रशिक्षणातंर्गत बनवलेल्या वस्तूंची पाहणी केली.
या कार्यशाळेतून उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रेरणा व दिशा मिळाली असून, भविष्यात व्यवसाय उभा करताना अडचणी येणार नसल्याची भावना प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जन शिक्षण संस्थेच्या सर्व प्रशिक्षिका व सहकार्यांनी परिश्रम घेतले. क्षेत्र भेटीचे नियोजन छत्रपती संभाजीनगर जन शिक्षण संस्थेचे संचालक रणधीर गायकवाड यांनी केले होते.