पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार
तमस मानसिक गुलामगिरी झुगारण्यासाठीचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील तमस मानसिक गुलामगिरी झुगारुन लावण्यासाठी पीपल्स हेल्प लाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी व्यापक संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
तमस मानसिक गुलामगिरीच्या लोकांनी संघटित होऊन महात्मा गांधीजींची जाहीर हत्या केली. त्यानंतर सुद्धा आजपर्यंत संपूर्ण देशात तमस गुलामगिरी जोपासली गेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षात सुद्धा स्वातंत्र्याची फळे सर्वसामान्यांना मिळालेली नाहीत. त्यामुळे आज देखील मतदार कोंबडी, दारू, पैसे घेऊन मत विकतात व जातीच्या नावावर मत दिली जातात यामुळे व्होट माफिया मागच्या दाराने सत्ता काबीज करतात. तर सत्तेतून जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.
देशात प्रजासत्ताक राज्य आले, परंतु निरंतर राष्ट्रीय कर्तव्य योग देशातील मोठ्या संख्येने लोक विसरले आहेत. त्यामुळे उन्नत चेतना सर्व शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. भगवद्गीता ही पोथी नसून, उन्नत चेतना प्राप्तीचे मानसशास्त्र आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी गीतेला क्रांतीकारी मानसशास्त्र म्हणून स्वीकारले आहे. या देशात शाळा, महाविद्यालयात गीतेतील उन्नत चेतना प्राप्तीचे धडे दिले जात नाहीत. यातून देशातील 40 टक्के लोकसंख्या ढब्बू मकात्या प्रवृत्तीची झाली आहे. त्यामुळे अहमदनगर शहराच्या प्रत्येक रस्त्यावर अनेक वर्ष खड्डेच खड्डे आहेत. सार्वजनिक प्रश्नाबाबत मला काय त्याचे? अशी उदासीन प्रवृत्ती गीतेतील मानसशास्त्र न शिकल्यामुळे निर्माण झाली असल्याचे म्हंटले आहे.
राष्ट्राचे हित आणि आपले कर्तव्य याची पर्वा मोठ्या लोकसंख्येला नसल्यामुळे देशात भ्रष्टाचाराने अनागोंदी आणि टोलवाटोलवी टोकाला पोहोचली आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उन्नत चेतनेची प्राप्ती दिली. त्यातून दृष्ट, समाजकंटक, तमस प्रवृत्तीच्या कौरवांचा बिमोड झाला. भगवान श्रीकृष्णाच्या उन्नत चेतनेची दीक्षा आणि अर्जुनाचे शौर्य या दोन्ही गुणांचा संगम छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आढळून येतो. त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. इंग्रजांना या देशातून हाकलून दिले परंतु दिल्लीपासून गल्लीपर्यंत तमस चेतनेचे राज्य सुरू आहे. महात्मा गांधीजी यांना गीतेमुळेच उन्नत चेतना प्राप्ती झाली होती. परंतु आजचे राज्यकर्ते तमस चेतनेचे बळी ठरले आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र तमस मानसिक गुलामगिरी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोसली गेली आहे. यातून तमाम देशाला बाहेर आणण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी व्यापक संघटन उभी करण्यासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. मेहबूब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे आदी प्रयत्नशील आहेत.
