शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल यांना लाभ मिळत असताना कर्मचारींना का नाही?
नगरसेविका शिला दीप चव्हाण यांचा प्रश्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेत असताना फक्त कर्मचारी वर्गाला या लाभापासून वंचित ठेवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केला आहे. तर जिल्ह्यातील इतर नगरपालिका कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला जात असताना, फक्त शहराच्या महापालिकेत कर्मचार्यांना आयुक्तांच्या नाकर्तेपणामुळे डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राज्यातील महापालिका (बृहन्मुंबई वगळून) नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्राथमिक शिक्षकांना व कर्मचार्यांना अटी, शर्तीनूसार सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 2 ऑगस्ट 2019 रोजी निर्गमीत केला. महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांचा अर्धा पगार राज्य शासन व अर्धा महापालिकेकडून दिला जात आहे. तर मनपा त्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देखील देत आहे. मात्र हा लाभ मनपा कर्मचार्यांना अद्यापि देण्यात आलेला नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल हे वेतन घेत आहे.
कर्मचार्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या लाभाची मागणी केल्यास आयुक्तांकडून फक्त राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मान्यता आलेली नसल्याचे उत्तरे दिले जात आहे. मात्र शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी त्यांनी शासनाकडे कोणता पत्रव्यवहार केला होता? व कोणाची मान्यता घेतली होती? असा प्रश्न शिला चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका आयुक्त दुटप्पीपणाची भूमिका घेत असून, 44 शिक्षक 105 सेवानिवृत्त शिक्षक व ठराविक अधिकारी, कर्मचारी सातवा वेतन आयोगाचा लाभ घेत असताना 32 लाख रुपये खर्च येत आहे. उर्वरित महापालिकेतील दीड ते दोन हजार कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सध्या आठव्या वेतन आयोग लागू होण्याची वेळ आली तरी, मनपा कर्मचारी सातव्या वेतनाच्या लाभापासून वंचित आहेत.
ठराविकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देताना मनपाच्या तिजोरीवर बोजा पडला नाही का? राज्यातील अनेक महापालिका आर्थिक सक्षम नसल्या तरी आपल्या कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ त्या देत आहे. अहमदनगरच्या महापालिकेत सातव्या वेतन आयोगाचा लाभ कर्मचार्यांना लागू न झाल्यास कर्मचार्यांसह आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा शिला चव्हाण यांनी दिला आहे.