राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांची उपोषणाला भेट
ज्येष्ठांच्या उपोषणाचे गांभीर्य मनपा प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रस्त्याच्या निकृष्ट व अर्धवट कामाविरोधात गुलमोहर रोड पारिजात चौक येथे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणास राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी मध्यरात्री भेट देऊन उपोषणात सहभाग नोंदवला. ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषण स्थळी कोणताही वैद्यकीय कर्मचारी अथवा पोलीस बंदोबस्त आढळला नसून, या उपोषणाचे गांभीर्य देखील मनपा प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. तर उपोषणकर्त्यांना वार्यावर सोडणार्या मनपा अधिकारी व प्रशासनाचा निषेध त्यांनी नोंदविला.
गुलमोहर रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामा संदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी (दि.20 फेब्रुवारी) महापालिकेच्या विरोधात उपोषण सुरु केले. रस्त्याचा दर्जा तपासून रुंदीकरण करण्यात यावे व रस्त्यावरील अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्याची मागणीसाठी उपोषण सुरु आहे. यामध्ये शिरीष जानवे, महेश घावटे, अॅड. लक्ष्मीकांत पटारे, अनिल सानप, अभिजीत दरेकर, सचिन कसबे, सातपुते आदींसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री उपोषणकर्त्यांना प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला सामोरे जावे लागल्याचे चित्र समोर आले. संध्याकाळी साडेसहा वाजता एका ज्येष्ठ नागरिकास चक्कर येऊन पडले, त्यानंतर प्रशासनाने रात्री साडेदहा वाजता सरकारी रुग्णालयातून कर्मचारी पाठवून उपोषणकर्त्यांची तपासणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बेफिक्रीचा उपोषणकर्त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. तर हे आंदोलन अधिक तीव्र करुन जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याची ठाम भूमिका ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महेश घावटे म्हणाले की, लोकशाहीत ज्येष्ठ नागरिकांना उपोषण करण्याची वेळ येते, ही सर्वात मोठी शोकांतिका व खेदजनक बाब आहे. हे उपोषण सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी व न्याय हक्काच्या मागण्यासाठी आहे. मनपा प्रशासनाला या उपोषणाचे गांभीर्य राहिलेले नाही. या उपोषणात मनपाचे अधिकारी व प्रशासन उपोषणातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे जीव जानाच्या वाटेवर असल्याचे सांगितले.
गुलमोहर रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देखील मनपा अधिकारी व प्रशासनाला व्यवस्थितपणे काम करुन घेता आले नाही. ठेकेदार व अधिकार्यांच्या हेव्यादाव्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला आहे. आमदार जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र काम अर्धवट राहिलेले असून, काम दर्जेदार करुन घेणे मनपा अधिकार्यांची जबाबदारी आहे. -इंजि. केतन क्षीरसागर