पारनेर दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी व पारनेर तालुका सैनिक बँकेने जमीन विक्री घोटाळा केला असल्याचा आरोप करीत भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनच्या वतीने सदरील सर्व व्यवहाराची चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी 1 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अरुण आंधळे यांनी दिली.
पारनेर दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्राद्वारे व बनावट इसम उभा करुन जमीन विक्री व्यवहार झाला आहे. सैनिक बँकेने कर्जदाराच्या जमिनीची कवडीमोल भावाने बिगर शेतकर्यांना विक्री केली आहे. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊनही पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार यांच्यावर कारवाई अद्यापि करण्यात आलेली नसल्याचे आंधळे यांनी म्हंटले आहे. या संदर्भात चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल होण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनाला भ्रष्ट्राचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशान्वये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. गुंडाराज आणि लॅण्ड माफीयाविरोधातील या आंदोलनात संघटना सक्रीय सहभाग घेणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.