शाहिरांच्या धार्मिक व अध्यात्मिक सवाल-जवाबात श्रोते मंत्रमुग्ध
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तिसर्या माळेला रात्र जागविणार्या कलगीतुराचा कार्यक्रम रंगला होता. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी धार्मिक व अध्यात्मिक सवाल-जवाबाच्या फडाचा आनंद घेतला.
बुर्हाणनगर येथून तुळजापुरला जाणारी पालखी व जुन्नर येथून तुळजापुरला नेला जाणारा पलंग यांच्या ऐतिहासिक भेटीदरम्यान भिंगार येथे सरपन गल्ली येथे कलगीतुरा फड भरविण्याची तीनशे वर्षाची परंपरा आहे. या कलगीतुराचा कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या हस्ते झाला. भाऊ कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी चौरे गुरुजी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रमेश साके, मुळापाटबंधारे विभागाचे सवई विनायक रावसाहेब, शाहीर राजू निमसे, शाहीर कान्हू सुंबे आदी उपस्थित होते.
प्रारंभी गेल्या दोन वर्षात कोरोना काळात स्वर्गवासी झालेले शाहीर व श्रोत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बालशाहीर मयंक दीपक कर्डिले याच्या शिवगर्जना व पोवाड्याने कलगीतुरा कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातील कलगी व तुरेवाले, शाहीर डफ, तुणतुणे, ढोलकी, झिळकर्यासह सहभागी झाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने सवाल-जवाबचा सामना ऐकण्यास हजेरी लावली होती.
भिंगार हा कलगीतुर्याचा फड केवल धार्मिक व आध्यात्मिक सवालजवाबबद्दल प्रसिद्ध आहे. त्यामुळे ब्रह्म-माया, देह-आत्मा, देव-दानव या विषयावरील सवाल जवाबदासाठी शाहिरांना आपल्या जवळील जुन्या बाडांचा आधार घ्यावा लागत होता. या कार्यक्रमास संभाजी धारे (इगतपुरी नाशिक), शिवाजी वाणी (गोळेगाव जुन्नर), रामदास काळे (जुन्नर), निजाम शेख (श्रीगोंदा), गोंदाराम चौरे गुरुजी (वडगाव आमली), कान्हू सुंबे (इमामपूर) राजू निमसे (खारे कर्जुने), शिवाजी दाताळ (आठवण परंजी), पानसंबळ (खारे कर्जुने), शंकर पांडुरंग म्हस्के (देऊळगाव घाट), अंबादास बेद्रे (नगर), चौरे सर, सागर चौरे (पुणे), बबनदास चौरे (पारनेर) इत्यादी शाहिरांनी सहभाग नोंदवला.
कलगीतुर्याचे अध्यक्ष भाऊ कर्डिले यांनी सर्व शाहिरांचा सन्मान केला. विक्रांत मोरे, माजी सैनिक कोकणे, साके, विनायक सवाई, नगरसेविका शुभांगी साठे, ज्ञानेश्वर हळगावकर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमरज्योत तरुण मंडळ, गणेश ताठे महाराज मित्र मंडळ, रतीलाल गुगळे, संजय बोंदर्डे, साईनाथ गोत्राळ, आदित्य दिवटे महाराज, जय नागपुरे, राजू शेख, राजू परदेशी, अभय औटी, चिनू परदेशी यांनी परिश्रम घेतले.
