टाळ-मृदूंगाच्या निनादात व ज्ञानोबा… तुकोबाच्या गजरात नवीन मराठी शाळेची दिंडी उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्यांची दिंडी उत्साहात पार पडली. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले तर रंगीबेरेंगी साड्या परिधान केलेल्या मुली डोक्यावर तुलस घेऊन सहभागी झाल्या होत्या.

हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत निघालेल्या या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण ठरले.
शालेय समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर, सदस्य संजय सपकाळ, रविंद्र बाकलीवाल, मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे, पूर्व प्राथमिकच्या विभाग प्रमुख अर्चना गायकवाड यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करुन दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली. बाल वारकर्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

दिंडीच्या अग्रभागी फुलांनी सजविण्यात आलेल्या पालखीचा समावेश होता. दिंडीत प्राथमिकसह पूर्व प्राथमिकचे विद्यार्थी सहभागी झाले होते. भक्तिमय अभंग गायन व हरिनामाच्या गजराने परिसर भक्तीमय बनला होता. बाल वारकरींची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
नगर-पाथर्डी रोड, सौरभनगर, अमेयनगर खळेवाडी मार्गे शाळेत रिंगण सोहळ्याने समारोप झाला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.